कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी शासनाकडून ‘एवढा’ निधी मंजूर

सांगली |  वारणा प्रकल्पाच्या 87 हजार हेक्टर लाभ क्षेत्रापैकी 46 हजार 78 हेक्टर क्षेत्र वारणा नदीवरील उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनाखाली आणण्याचे नियोजित आहे. त्यासाठी वारणा धरण ते वारणा- कृष्णा संगमापर्यंत कोल्हापूर पद्धतीचे नऊ बंधारे घालण्यात आले आहेत. यामध्ये वाळवा तालुक्यातील मांगले सावर्डे व कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे (कुंडलवाडी) या दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

तथापि, सदर दोन्ही बंधारे जवळपास चाळीस वर्षापासून असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी 21 जून रोजी याची प्रत्यक्ष पाहणी करुन चावरे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास 4 कोटी 47 लाख व मांगले सावर्डे कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास 3 कोटी 96 लाख इतक्या रक्कमेस विशेष दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वारणा नदीस दरवर्षी किमान दोन वेळा महापूर येत असतो, तसेच रब्बी हंगामापासून उन्हाळी हंगाम संपेपर्यंत बंधाऱ्यात वेळोवेळी प्रकल्पीय सिंचन, तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे बंधाऱ्यामध्ये बहुतांश वेळी पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा करावा लागतो. वाळवा तालुक्यातील मांगले – सावर्डे येथे सन 1979 साली बंधारा बांधलेला असून 1979 पासून पाणीसाठा करण्यात येत आहे.

सदर बंधाऱ्याची एकूण लांबी 109.40 मीटर व जास्तीत जास्त उंची 11.44 मीटर असून एकूण 24 गाळे आहेत. बंधाऱ्याची जास्तीत जास्त साठवण क्षमता 5.56 दलघमी (196.35 दलघफू) असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 10015 हेक्टर आहे. सदरचा बंधारा जवळजवळ 38 वर्षापूर्वी बांधलेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे (कुंडलवाडी) येथे एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सन 1973 साली बांधलेला असून 1974 पासून पाणीसाठा करण्यात येत आहे. सदर बंधाऱ्याची एकूण लांबी 90 मीटर व जास्तीत जास्त उंची 12.32 मीटर असून एकूण 29 गाळे आहेत. बंधाऱ्याची जास्तीत जास्त साठवण क्षमता 4.75 दलघमी (167.75 दलघफू) असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 8548 हेक्टर आहे. सदरचा बंधारा जवळजवळ 45 वर्षापुर्वी बांधलेला आहे.

 

-मुंबईतील रूग्णालयाबाहेरचे 1000 मृत्यू का लपवले? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-सुशांतचा ‘दिल बेचारा’च्या रिलीजची तारीख ठरली, ‘या’ दिवशी पहायला मिळणार सिनेमा