‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’; रोहित पवारांचं नेमक्या शब्दात अर्थसंकल्पावर टीकास्त्र

मुंबई |  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-2021 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. भाजप नेत्यांनी आजच्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांनी मात्र आजचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे.

वर्ष संपत असताना देशात मंदीचे लोट येतील, बेरोजगारी वाढेल आणि अराजकतेची स्थिती निर्माण होईल असं चित्र आहे. सत्ताधारी म्हणून अर्थसंकल्पाचं समर्थन आणि विरोधक म्हणून टिका करण्यापेक्षा तटस्थपणे बजेटकडे पाहिल्यास ‘गंडवागंडवीचा’ सरकारचा प्रकार लक्षात येतो, असं अर्थसंकल्पाचं वर्णन करत त्यांनी शेलक्या शब्दात बजेटवर टीका केली आहे.

5 लाखांपर्यन्तच्या ठेवी सुरक्षित असतील हे सांगायची वेळ येत असेल तर बॅंकींग प्रणाली कुठल्या स्थितीतून जात आहे हे लक्षात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये सवलत दिल्याचं भासवलं असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करुन टॅक्समध्ये बेनिफिट घेणाऱ्यांना यापुढे तो मिळणार नाही. याला एका हाताने देणं आणि दुसऱ्या हाताने काढून घेणं असंच म्हणावं लागेल, असं म्हणत त्यांनी सरकारच्या करप्रणालीवर देखील बोट ठेवलं आहे.

सरकारला लोककल्याणकारी योजनांचं बजेट कमी करु वाटतं…. यातून गरिबांबद्दल सरकार काय विचार करते ते लक्षात येईल. छोट्या गुंतवणूकदारांना बजेटमध्ये काय देण्यात आलं तर शून्य सोडून काही राहत नाही. शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्मीती करण्यावर, सध्याच्या बेरोजगारीवर भाष्य करण्यात आलेलं नाही. तरुणांच्या तोंडाला अप्रेंटिशीपची पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सांगून हमीभावाबद्दल बोलण्यात आलेलं नाही. आरोग्यासाठीच्या निधीत कपात केली आहे. कृषीचा विकास दर निच्चांकी असून त्याबाबत भरीव उपायोजना नाहीत, अशी टीका त्यांनी केलीये.

LIC ला माहित असतं केंद्रात असे सरकार येणार आहे तर त्यांनी सर्वात प्रथम स्वत:ची पॉलिसी काढली असती, असा टोला देखील त्यांनी केंद्राला लगावला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्म्यानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं”

-अहो आव्हाडजी, अदिवासींच्या घरात खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर कुठून आलं?

-सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव

-सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव 

-” लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुफडासाफ करायला वेळ लागणार नाही… जरा जपून बोला”