राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजभवनावर फेऱ्या चांगल्याच वाढल्या आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याचं निवेदन दिलं. तसंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर आणि शरद पवारांवर टीका केली. यानंतर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. तसंच साखर उद्योग देखील अडचणीत आला आहे. या दोन्ही विषयांवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्रं लिहिली. त्यावर शरद पवार यांनी असंच एखादं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला. त्यांच्या याच टोल्याला रोहित यांनी उत्तर दिलं आहे.

साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल असं मला वाटतं, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला.

स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड होतेय, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. गरिबांना रेशनधान्य मिळत नाहीत, रुग्णसंख्या लपविण्याचे प्रकार सुरू आहेत तसंच मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन होत नाही, अशा सरकारच्या त्रुटी फडणवीसांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात मांडल्या आहे.

देवेंद्र फडणवीसजी आपण जे विविध मुद्दे मांडले आहेत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल, असा सल्ला देखील त्यांनी फडणवीसांना दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

-“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”

-…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात