चंद्रकांतदादा, गुलाल खेळायला येणार होता बारामतीत… येताय ना???

पुणे : चंद्रकांत दादा, बारामतीत गुलाल खेळायला कधी येताय?, असा सवाल महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

चंद्रकांत दादा पाटील, गुलाल खेळायला येणार होता बारामतीत. येताय ना?? गुलाल पण तयार आहे, आणि ज्याच्यासाठी खेळायचा तो उमेदवार तर एक लाख चौपन्न हजार मतांनी विजयी झाला आहे, असं चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

चाकणकर यांनी ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. कमेंट आणि लाईक्सचा या पोस्टवर अक्षरशः पाऊस पडला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत, त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला.

या जागेवरुन भाजप आणि राष्ट्रवादीत चांगला कलगीतुरा रंगला होता. विजयानंतर त्याचे पडसाद उमटणे सहाजिकच होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. भाजप आणि मित्रपक्ष यावेळी ४३ जागा जिंकतील आणि ४३वी जागा बारामतीची असेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. 

Devendra Fadnavis

बारामतीची जबाबदारी भाजपने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघात तळ ठोकला होता. २३ तारखेला मी बारामतीत गुलाल उधळायला येणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तेव्हा त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.

Related image

दरम्यान, बारामतीत राष्ट्रवादीनंच पुन्हा एकदा बाजी मारली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला भरती आली. रुपाली चाकणकर यांनी त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांना बारामतीत कधी गुलाल खेळायला येता?, असा सवाल केला आहे. आता चंद्रकांत पाटील रुपाली चाकणकर यांच्या या आव्हानाला काय उत्तर देतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.