पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचा पंकजा मुंडेंना ‘चिक्की खाण्याचा’ सल्ला

पुणे : भाजप आणि राष्ट्रवादीच्या कलगीतुऱ्यात आता दोन्ही पक्षांच्या महिला नेत्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीवर टीका करताच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांना तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

बीडमधील गर्दी पाहून ताईंना खूपच धक्का बसला वाटतं. सावरा जरा स्वतःला… शांत व्हा… पाणी घ्या… थोडी चिक्की खा… बरं वाटेल, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.  ये तो सिर्फ ट्रेलर है… पिक्चर अभी बाकी है, असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

दरम्यान, बीडमधील स्थानिक उद्घाटनांवेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं होतं. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही. मला विरोध करण्यासाठी केंद्रीय पातळीवरच्या नेत्याला मुक्काम ठोकावा लागला, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता.