शिक्षकदिनी रमाकांत आचरेकरांच्या आठवणीने सचिन भावूक; म्हणतो…

मुंबई | मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनसारखा हिरा पारखणारे त्याचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांनी सचिनला केवळ क्रिकेटचंच नाही तर आयुष्यातले पण अनेक धडे दिले आहेत.

सचिनने आज शिक्षक दिनानिमित्त आचरेकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आचरेकर यांचं या वर्षी जानेवारी महिन्यात निधन झालं आहे. सचिनने त्यांच्यासोबतचा आपला एक जुना फोटो शेअर करत शिक्षक दिनानिमित्त त्यांची आठवण काढली आहे.

शिक्षक केवळ शिक्षणच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारी मूल्यंही रुजवून जातात. आचरेकर सरांनी मला मैदानावर ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ शिकवला आणि आयुष्यातही सरळमार्गी चालण्याची शिकवण दिली, असं भावूक ट्विट सचिनने केलं आहे.

माझ्या आयुष्यातल्या त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. त्यांनी दिलेले धडे मला आजही मार्ग दाखवतात, असं सचिनने म्हटलं आहे.

दरम्यान, रमाकांत आचरेकर यांनी सचिनसह अजित आगरकर, चंद्रकांत पाटील, प्रवीण आमरे, विनोद कांबळी यांनाही प्रशिक्षण दिलं. त्यांना 1990 साली ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, तर 2010 साली त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान देण्यात आला.