संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यानं आपल्या कुत्र्याला दिलं सदाभाऊ खोत नाव!

अहमदनगर : दूध आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात संताप व्यक्त होताना दिसतोय. नगरमधील एका शेतकऱ्यानं आपल्या कुत्र्याचं नामकरण केलं आहे. या शेतकऱ्यानं कुत्र्याला चक्क सदाभाऊ खोत यांचं नाव दिलं आहे. 

दूध आंदोलनाबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रस्त्यावर ओतल्या जाणाऱ्या दुधात दूध किती आणि पाणी किती? हे मला चांगलंच माहित असतं, असं ते म्हणाले होते. 

सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. ठिकठिकाणी सदाभाऊंचा निषेध केला जात आहे. त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला जातोय. 

नगरमधील या शेतकऱ्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी माझ्या कुत्र्याचं नामकरण सदाभाऊ खोत केलं आहे, असं हा शेतकरी सांगतोय. त्याने कुत्र्याला दुग्धाभिषेकही घातला आहे. तसेच या दुधात दूध किती आणि पाणी किती चेक कर, असंही हा शेतकरी म्हणताना दिसतोय. 

दरम्यान, राज्यात दूध दरवाढीच्या आंदोलनानं चांगलाच पेट घेतला आहे. मुंबई आणि पुण्याला आज या आंदोलनाची चांगलीच झळ बसणार आहे.