सक्षणा सलगर यांनी राणा जगजित सिंहांविरोधात थोपटले दंड; पक्षाकडे उमेदवारीची मागणी

उस्मानाबाद |  2019 च्या विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. विविध राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीची पडझड पाहता ‘तरुणांना संधी दिली जाईल’ हे वाक्य पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी नवी उमेद देणारं ठरत आहे. अशीच उमेद राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा आणि आक्कुबाई पाडोळी गटाच्या जि.प. सदस्या सक्षणा सलगर यांच्या मनात आहे. त्याच दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि माजी मंत्री पदमसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातलं राजकारण क्षणार्धात पालटलं आहे. पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

पाटील यांच्या भाजपात जाण्याने कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागली आहे. ‘तरुणांना संधी’ हे शब्द आता पक्षाला सत्यात उतरवायची संधी आहे, असं बोललं जातंय. एका दिग्गज उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी सक्षणा सलगर यांना उमेदवारी देणार का? यानिमित्ताने हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.

पदमसिंह पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील यांना पवार कुटुंबीयांनी एवढी वर्ष सत्ता उपभोगायला देऊनही त्यांनी पक्षाच्या कठीण काळात साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश का केला असावा, असा प्रश्न मतदारसंघातील लोकांना पडला आहे. राष्ट्रवादीचे काही कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक यांनी सलगर यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून कामाला लागले आहेत. आज त्यांनी सलगर यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात सलगर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती भाषणं केली. खा. सुळे यांच्या त्या विश्वासू मानल्या जातात. पवार-सुळे खरंच एका सर्वसामान्य घरातल्या आणि उच्चशिक्षीत मुलीला उमेदवारी देणार का? अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-