Top news महाराष्ट्र मुंबई

“मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही परप्रांतीय हातात, शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”

मुंबई |  लॉकडाऊन असल्याने हाताला काम मिळत नाहीये त्यात कोरोनाचा आभाळाएवढं संकट… त्यामुळे अनेक कष्टकरी परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. यामुळे सारेच परप्रांतीय गावाकडे परतत आहेत, असं एकंदरित चित्र उभं केलं जात आहे. याचविषयी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दीर्घ भाष्य करत सत्यपरिस्थितीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईतून परप्रांतीय मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. आता त्यांच्या जागा मराठी तरुणांनी घ्यायला हव्यात, संधी आली आहे असे सांगितले जात आहे. ते तितकेसे खरे नाही. जे निघून गेले ते सर्व असंघटित, रोजंदारीवर काम करणारे होते. मुंबईच्या आर्थिक नाड्या आजही परप्रांतीयांच्याच हाती आहेत हे सत्य कसे नाकारणार?, असं संजय राऊत म्हणाले आहे.

मुंबईतील रेस्टॉरंट आणि त्यांचे उपरे मालक येथेच आहेत. त्यांचा मजूरवर्ग सोडून गेला. हे चित्र आज सर्वच क्षेत्रांत आहे. मॉल्स, टॉवर्स, जमिनी, मोठी इस्पितळे, शैक्षणिक संस्थांची मालकी आपल्याकडे नाही व या उद्योगांचे मालक मुंबईच्या टापूवर ‘शेठ’ म्हणून बसलेच आहेत. ‘शेठ’ मंडळींची जागा घेण्याचे काम व्हायला हवे. स्थलांतरित मजुरांच्या जागा भरण्याचे स्वप्न आपण का बघायचे?, असंही राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’मध्ये लिहिलं आहे.

कोरोनाच्या भीतीने परप्रांतीय मजूर मुंबईसारखी शहरे सोडून गेले या सर्व ‘संधी’ आहेत व आता मराठी तरुणांचे कल्याण होईल, असे म्हणता येणार नाही. ‘ते’ डंख मारणारे आहेतच की… मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील मोक्याच्या जागा, संपत्ती, व्यापार आजही परप्रांतीयांच्याच हातात आहे व ते काही आपली घरे, इस्टेटी मागे ठेवून मुंबईतून पळून गेल्याचे दिसत नाही, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, घरातील कुणी नाही- नितीन गडकरी

-पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

-केंद्राने सावकाराचं काम करू नये; मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे- राहुल गांधी

-10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख