महाराष्ट्र मुंबई

वैभव राऊतसह इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत; ‘सनातन’नं हात झटकले!

नालासोपाऱ्यात जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रास्त्र प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, असा दावा सनातन संस्थेने केला आहे. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनिल घनवट यांनी देखील भूमिका मांडली. 

‘सनातन’चे चेतन राजहंस काय म्हणाले?

“नालासोपारा प्रकरणी अटक करण्यात आलेले वैभव राऊतसह इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत. आमच्याविरोधात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याविरोधात आम्ही कायदेशीर मार्गाचा आधार घेणार आहोत. आमची बदनामी केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करु. तपासात थेटपणे अद्याप सनातनचं नाव आलेलं नाही. सनातलना टार्गेट केलं जात आहे. सनातनमुळे कधीच जातीय तेढ निर्माण झालेलं नाही. आम्ही देशाच्या सुरक्षेत अडथळा आणलेला नाही. कोणत्याही कागदपत्रात आमचं नाव नसतानाही बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. आरोपात तथ्यच नाही त्यामुळे बंदीचा प्रश्न येतच नाही. मराठा आंदोलनात घातपात करण्याचा आरोप साफ खोटा असून आरोप करणाऱ्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. 

काय आहे प्रकरण?

नालासोपाऱ्यात राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली होती. यानंतर अनेकांना अटक करण्यात आली. डॉ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांशी यांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ने पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली.

वैभव राऊतच्या समर्थनार्थ निघाले मोर्चे-

सनातनचे वैभव राऊत सनातनचा साधक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र वैभव राऊतच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. वैभव राऊत निर्दोष असल्याचं छातीठोकपणे सांगितलं जातंय. ‘हमारा नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो‘ अशा प्रकारच्या घोषणा या मोर्चांमध्ये दिल्या जातात. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी वैभव राऊतला पाठिंबा दिला आहे. वैभव राऊत तसेच इतर आरोपींना न्यायालयीन मदत करण्यासाठी यापैकी काही संघटनांनी पुढाकार घेतला आहे. 

IMPIMP