पुणे महाराष्ट्र

शिस्तीत राहायचं… पोलीस अधीक्षक संदिप पाटलांचा पुण्यातील भाई लोकांना दम

पुणे जिल्ह्यातील भाईगिरीला आळा घालण्यासाठी नवीन पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. संदिप पाटील तडीपार आणि मोक्का लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यातही वेळ पडली तर शंभरहून अधिक टोळ्यांवर मोक्का लावण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असं संदिप पाटील यांनी म्हटलं आहे. संदीप पाटील यांच्या या इशाऱ्यामुळे पुणे परिसरातील भाई लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहे. कंपन्यांमधील कामांवरुन भांडणाचं मोठं प्रमाण आहे. यासोबतच गुंठामंत्र्यांनी जिल्ह्यात हैदोस घातला आहे. यांच्या जोडीला लँड माफिया, वाळूमाफिया, खासगी सावकार तसेच लोकल भाई-दादा उदयास आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे.

संदिप पाटील यांनी अशा भाई लोकांची पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळवण्याचा सूचना आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या भाई लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन ते काय करतात याची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संदिप पाटलांनी कंबर कसली आहे.  

पोलीस अधिकाऱ्यांना देखील संदिप पाटील यांनी इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील अवैध धंदे, अवैध वाहतूक, गुटखा विक्री बंद करावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणले आहेत. 

IMPIMP