मुंबई | राज्याच्या राजकारणात 2019 च्या विधानसभा निकालानंतर ऐतिहासिक घडामोड घडली. शिवसेनेच्या धाडसी निर्णयानं राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा वाद देखील झाले आहेत. अशात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शिवसेना मंत्र्यांवर नाराज आहेत.
शिवसेनेचे दोन मंत्री माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असा आरोप टोपेंनी केला होता. राजेश टोपेंनी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्यावर आरोप केले होते.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्याचं काम भूमरे आणि सत्तार हे करत आहेत. मी अब्दुल सत्तार यांना सांगणार आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नये, असं टोपे म्हणाले होते.
राजेश टोपे यांच्या टीकेवर शिवसेना नेते मंत्री संदिपान भुमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी दादागिरी केली असती तर 35 वर्षांपासून राजकारणात टिकलो नसतो, असं भुमरे म्हणाले आहेत.
मी आजपर्यंत सर्वांना सोबत घेऊन राजकारण केलं आहे. राजेश टोपे खोटं बोलत आहेत, त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असंही भुमरे म्हणाले आहेत.
राजेश टोपे काय बोलले हे आपल्याला माहित नाही पण आजपर्यंत मी कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षात घेतलं नाही, असं म्हणत भुमरे यांनी टोपेंचे आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, राजेश टोपे आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये अनेकदा वाद उफाळून आले आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“आमचं घर दिसत मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही”
‘राज्यातील वातावरण बिघडवाल तर…’; वळसे-पाटलांचा गंभीर इशारा
स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!