मुंबई | लॉकडाऊन करताना ‘नोटबंदी’प्रमाणे नियोजन नव्हते यावर चर्चा होऊ शकेल. टाळेबंदी केली नसती तर विषाणू जास्त पसरला असता. रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढला असता हे खरे, पण नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतेही नियोजन नव्हते. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखआतून केली आहे.
कठीण प्रसंगी निर्णय एकांगी घेऊन चालत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन पावले टाकावी लागतात. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत ‘धक्का’ द्यायचाच म्हणून काँग्रेसचे आमदार विकत घ्यायचे किंवा फोडायचे, मध्य प्रदेशात ठरवून सरकार पाडायचे आणि यासाठी जसे नियोजन केले जाते तसे काटेकोर नियोजन टाळेबंदीबाबतही करणे गरजेचे होते. येथे देशाचा भविष्याचा प्रश्न आहे.
सरकारने २० लाख कोटीचे पॅकेज दिले, पण निसर्ग वादळाप्रमाणे ते पॅकेज घोंघावत आले व गेले. बजाज यांनी नेमके हेच सांगितले आहे. लोकांना थेट मदत करा असे राहुल गांधी, रघुराम राजन व आता राजीव बजाज यांनीही सांगितले आहे, पण नियोजन व दिशा नाही. हे नियोजन आता प. बंगाल व बिहार विधानसभेच्या निवडणुकांत दिसून येईल. अर्थव्यवस्थेस दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ कसा वाजला आहे हे राजीव बजाज यांनी सांगितले. हे सर्वस्वी त्यांचे मत आहे. सरकारच्या धोरणांवर टीका कराल तर अडचणीत याल असा सल्ला बजाज यांना देण्यात आला होता, पण ऐकतील ते बजाज कसले? राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत, असं म्हणत त्यांनी बजाज यांच्या निर्भीडपणाचं कौतुक केलं आहे.
सरकारचे उंबरठे झिजवून कंत्राटे मिळविणारे, बँकांची कर्जे बुडवून श्रीमंतीचा थाट मिरवणाऱ्यांपैकी ते नाहीत. राजीव बजाज यांचे पिताश्री राहुल बजाज हे तोंडफाट सत्य बोलण्याबद्दल प्रख्यात आहेत. चमचेगिरीशी त्यांचा कधी संबंध आल्याची नोंद नाही. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे. अर्थव्यवस्थेची दशा काय ते यानिमित्ताने दिसले. देशाने राहुल गांधी यांचेही आभार मानलेच पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टाळेबंदीत गांधी यांनी अनेकांना बोलते केले, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून देशाने राहुल गांधी यांचे आभार मानायलाच हवेत; शिवसेनेचं ‘रोखठोक’ मत
-‘या’ बड्या नेत्याने ट्विटरवरून भाजप हटवले, पक्षामध्ये एकच खळबळ
-शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्र्यांचं शिवाजीराजांना वंदन
-पुणे महापौरांच्या पाठीवर चंद्रकांतदादांची कौतुकाची थाप तर अजित पवारांना मात्र झिरो मार्क
-राज्यात आज 2436 जणांना कोरोनाची लागण; पाहा तुमच्या भागात किती?