डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

मुंबई | ठाकरे सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका करत महाराष्ट्र भाजपने आज सरकारविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ या आंदोलनाच्या निमित्ताने भाजप ठाकरे सरकारविरोधात आज राज्यभर निदर्शने करणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याच आंदोलनाचा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यथेच्छ समाचार घेतला आहे.

भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असंही राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर ताणतणावामुळे परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ‘मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?’ या सगळय़ाचे वैफल्य येणे साहजिकच आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली देखील उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत, मेरा आंगण मेरा रणांगण”

-उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

-लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन

-“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

-आत्तापर्यंत 30 लाख मजूर स्पेशल ट्रेन्सनी आपापल्या घरी पोहोचवले- पीयूष गोयल