मुंबई | आजच्या सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला चांगलंच झोडपून काढलं आहे. शरद पवारांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना तर राऊतांनी जोरदार फटकारत ‘कोथरूडचे उपरे पाटील’ अशी उपमा दिली आहे तर भाजपवर जोरदार आसूड ओढले आहेत.
भाजप नेत्यांनी कोकण दौरा केला म्हणून मुख्यमंत्री आणि शरद पवारांना कोकणचा दौरा करावा लागला, असा दावा पाटील यांनी केला होता. त्यावर आजच्या अग्रलेखात राऊत म्हणाले, “भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत. त्यामुळे पवार कोठे गेले, किती वाजता गेले, त्यांना कधी जाग आली वगैरे नोंदी ते आता ठेवू लागले आहेत. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही.”
शरद पवारांना आता जाग आली का? असा उटपटांग सवाल चंद्रकांत पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटनांवर राजेश टोपे म्हणाले…
-‘या’ गरीब देशानंही स्वतःला जाहीर केलं कोरोनामुक्त, सारं जग झालंय हैराण
-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
-तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?- देवेंद्र फडणवीस
-गुड न्यूज! देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त