देश

“मेक इन आणि स्टार्ट अप इंडियाच्या जाहीरातबाजीवर कोट्यवधी खर्च केले तसं आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये”

मुंबई | अर्थव्यवस्थेला उठाव देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. कोरोनामुळे झोपलेल्या अर्थव्यवस्थेस जाग आणण्यासाठी ही 20 लाख कोटींची खटपट आहे. या खटपटीस पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ म्हटल्याने आधीच्या सर्व संकल्पना आणि योजना मागे पडल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’वर आतापर्यंत कोटय़वधी रुपये नुसते जाहीरातबाजीवर खर्च केले तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.

हे 20 लाख कोटींचे वाटप कसे होणार याची फोड अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. म्हणजे अर्थशास्त्रीय भाषेत रुपया कसा खर्च होणार त्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.  20 लाख कोटी ही साधी रक्कम नाही. या 20 लाख कोटींचा हिशोब अर्थमंत्र्यांनी मांडताच पहिल्या पाच मिनिटांत शेअर बाजार घसरला, तो अद्यापि सावरू शकलेला नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं आहे.

अशा प्रकारचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरून आपटलेला हिंदुस्थान हा पहिला देश असावा. याचा अर्थ असा की, 20 लाख कोटी प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात अवतरतील काय? याबाबत कॉर्पोरेट जगतात शंका असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. उद्योगांत विश्वास निर्माण करण्याची क्षमता देशाच्या अर्थमंत्र्यांमध्ये आहे काय? कोरोनामुळे उद्योग, व्यापार आणि फक्त जीवनच थांबले आहे असे नाही तर ‘काळ’ गोठला आहे. तो कसा सोडवणार?, असा सवाल त्यांनी केला आहे.

अर्थमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत त्यानुसार सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तीन लाख कोटींचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. बाजारात रोख रक्कम खेळू लागली की मागणी वाढेल. त्यातून उत्पादन वाढेल. आपोआप अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगारही निर्माण होतील. कारखानदार आणि कामगार यांच्या हाती पैसा खेळत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेच्या पापण्या उघडणार नाहीत, असे नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनीही स्पष्ट केले आहे. गरीब व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सात-आठ हजारांची रोख रक्कम जमा करा, असं राहुल गांधी यांनी वारंवार सांगितले आहे. ते काही चुकीचे नसल्याचा पुनरूच्चार देखील राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”

-…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

-कोरोनानं बदलला वकिलांचा ड्रेस कोड; पाहा आता काय झालाय बदल…

-मॉडेलला प्रवास करायला राज्यपालांनी मदत केल्याचं वृत्त; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल

-बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन