“विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय?, विखे तर तडफडणाऱ्या माशांचे प्रतिनिधी”

मुंबई | भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर जळजळीत टीका केली होती. गांधी नेहरूंचा विचारांचा पक्ष आणि त्यांचे नेते मातोश्रीवर तासनतास थांबतात. सत्तेसाठी एवढा लाचार प्रदेशाध्यक्ष मी पाहिला नाही, अशी टीका विखेंनी थोरातांवर केली होती. आजच्या सामनाच्या अग्रेलाखातून संजय राऊत यांनी विखेंच्या टीकेची सव्याज परतफेड केली आहे.

संजय राऊत अग्रलेखात म्हणतात-

“वरचेवर पक्ष बदलण्याची कला राधाकृष्ण विखे यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते.”

“विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात. विखे काँग्रेस पक्षात होते. त्यांचे आजचे वैभव व सामाज्र ही काँग्रेसचीच दिलदारी आहे. आजचा तालेवारपणा ही काँग्रेसचीच देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते व त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते, पण एक दिवस विखे सहकुटुंब शिवसेनेत आले. राज्यात व केंद्रात मंत्रिपदे भोगली व नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले.”

“काँग्रेसकडून सत्तापद भोगले व 2019च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये. विखे यांनी थोरातांवर हल्ला केला. का, तर बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे काही मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांच्याशी तासभर चर्चा केली. ही चर्चा राज्यापुढील संकटासंदर्भात होती. चर्चेनंतर आपले समाधान झाले असल्याचा खुलासा थोरात यांनी केला. म्हणजे, महाविकास आघाडी स्थिर व मजबूत असल्याची ग्वाहीच थोरातांनी दिली. यावर विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय?”

“विखे हे सध्या काँग्रेस पक्षात नाहीत. ते सध्या ज्या पक्षात आहेत त्याबाबत त्यांनी बोलावं; पण सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्‍या माशांचे प्रतिनिधी आहेत. संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे.”

महत्वाच्या बातम्या-

-..म्हणून झूम ॲप वापरताना सावध राहा तर अशी काळजी घ्या… ‘महाराष्ट्र सायबर’ने केलं अलर्ट

-“मोदींचं अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली जातीये”

-“महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसलेत, एक-दोन नगरमध्ये तर 2 तळकोकणात”

-गुडन्यूज… भारतात कोरोनावरच्या या औषधाला परवानगी, औषध गेमचेंजर ठरण्याची शक्यता!