पणजी | आगामी गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही सोंगाडे नाही, देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ते गोव्यात माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस मला नटसम्राट म्हणतात. पण नटसम्राट हे महाराष्ट्रचं वैभव आहे. गोव्याला रंगभूमीची मोठी परंपरा आहे हे त्यांना माहीत नाही. राज्यातील सर्व नटसम्राट गोव्यातून गेले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्यातील कलाप्रेमींचा ते अपमान करत आहेत. नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे. गणपतराव बेलवलकरांच्या तोंडी. कुणी मला घर देता का घर… तशी फडणवीसांची अवस्था आहे, कुणी मला खुर्ची देता का खुर्ची… नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही, असंही ते म्हणालेत.
आम्हाला आनंद आहे की त्यांनी नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगड्या नक्कीच नाही. शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्याची राऊत यांनी खिल्ली उडवली. भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत. लहान लहान पक्ष आहेत. त्यात भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्यांचं स्थान नगरपंचायतीत कायम ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की अशीच लढाई लढा. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तुम्हाला बेरीज करावी लागेल. ती तुमच्यापेक्षा अधिकच आहे, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातही शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा सवाल केला असता ते म्हणाले, भविष्यात काय होणार हे मी गोव्यात बसून कसे सांगू? पुढल्या वाटचालीत हे दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. गोव्यात आमच्यासोबत यावं अशी सुबुद्धी काँग्रेसला सूचली नाही. पण महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. राज्यात कुणीही स्वबळाचा नारा दिला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत काही ठिकाणी वेगळे लढलो. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांचा तो निर्णय होता, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश
यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘भूत लागल्या प्रमाणे…’
राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
आठवड्यापासून बेपत्ता डूग्गू कसा सापडला?, वाचा काय घडलं?
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर