“ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने नरेंद्र मोदींना वाचवलं”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंडित नेहरूंनी त्यांच्या काळात विदेश मंत्रालय एक ‘स्वतंत्र इन्स्टिट्यूशन’प्रमाणे विकसित केले. आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहासाचे भान आणि भारतीय गुटनिरपेक्षता म्हणजे स्वतंत्र, अलिप्त भूमिकेची एक महान परंपरा आपल्या विदेश मंत्रालयास लाभली आहे, पण विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे. ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर मोदी टीका करीत राहिले तोच अलिप्तवाद त्यांना रशिया-युक्रेन वादात ‘युनो’मध्ये स्वीकारावा लागला! नेहरूंच्या धोरणानेच पंतप्रधान मोदींना वाचवलं, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले. त्यांना आणण्यासाठी सरकारला चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवावे लागले. दोन विद्यार्थी या युद्धात मरण पावले आणि शेकडो विद्यार्थ्यांना नरकयातना भोगत पायपीट करावी लागली, असं संजय राऊत म्हणाले.

भारत सामर्थ्यवान असल्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांची रशिया-युक्रेन सीमेवरून सुटका होऊ शकली! असे प्रचारकी भाषण पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत केले. सत्य असे आहे की, हजारो विद्यार्थ्यांना पहिले आठ दिवस वालीच नव्हता, असं सांगत संजय राऊतांनी मोदींवर टीका केली आहे.

पुतीन यांनी त्यांचा देश स्टालिनच्या काळात नेऊन ठेवला. स्टालिनच्या काळापासून रशियन लोकांवर एक मोठा परिणाम झाला, तो मुकेपणाचा. बोलण्याचे स्वातंत्र्य नसले की लोक दारू पिऊ लागतात. रशियात आज तेच घडत आहे. रशिया-युक्रेन युद्ध ही पुतीन यांची खाज आहे. चर्चेतून मार्ग काढता आला असता, पण पुतीन यांनी सरळ युद्धच पुकारलं, असंही संजय राऊत म्हणालेत.

शेकडो माणसे, सैनिक, लहान मुले मारली गेली. लोकांनी कष्टाने उभारलेली घरे, संस्था, उद्योग नष्ट झाले. एक संपूर्ण देशच संपला व लोक निर्वासित झाले, पण जागतिक मंचावर प्रत्येकजण राजकीय भूमिका वठवताना दिसत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ 

कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा?; जाणून घ्या एका क्लिकवर 

“शरद पवार म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, त्यांनी पावसातली सभा गाजवली पण…” 

आत्ताची मोठी बातमी! युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवली ‘ही’ अट