“उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले. विरोधी पक्ष भाजपनं ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणातील कमरेखालचे वार करुनही सरकार कायम आहे, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर टीका केली आहे.

गेल्या दोन वर्षात सरकार पाडू न शकणारा विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या नव्या तारखा देतो हा विनोद म्हणावा लागेल. ठाकरी बाण्यानं राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार आता लवकरचं पडेल असं म्हटलंय. भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे असा सवाल राऊत यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं, असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळं राज्यावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नोटाबंदी, कोरोना व्यवस्थापनातील अनांगोदी, तीन कृषी कायद्यांवर घ्यावी लागेलली माघार यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कोरोनाच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडातील व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, यावर भाजपचे ऑडिटर जनरल किरीट सोमय्या बोलायला तयार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पवारांच्या नातेवाईंकावर आयटीच्या धाडी, एसटी संप चिघळवण्यासाठी भाजपनं प्रयत्न, अमरावतीमध्ये जातीय दंगे भडकवणं हे सर्व करुन ही भाजप ठाकरे सरकारला चरोटाही पाडू शकलं नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

छगन भुजबळांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली, म्हणाले… 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं उडवली सरकारची झोप; महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू 

खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची राज्यात दहशत; मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय