“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”

मुंबई | राज्यात आता नवीन वाद उफाळून आला आहे. मालाड येथील मैदानाला म्हैसुरचा शासक टिपू सुलतानचं नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाद रंगला आहे.

मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यास भाजपनं जोरदार विरोध केला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मैदानाच्या बाहेर जाऊन कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं होतं.

मालाड मैदान परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त केला गेला आहे. राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

टिपू सुलताननं आपल्या कार्यकाळात हिंदूंची मंदिरं उद्धवस्त केल्याची टीका भाजपनं केली आहे. परिणामी अशा शासकाचं नाव देऊ देणार नाही, असा पवित्रा भाजपनं घेतल्यानं वाद वाढला आहे.

भाजपचा वाढता विरोध पहाता मुंबई पुन्हा दंगलीच्या उंबरठ्यावर उभी असल्याची भीती वर्तवण्यात आल्यानं राजकारण तापलं आहे. या वादात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.

राष्ट्रपतींच्या कर्नाटकमधील एका भाषणाचा दाखला देत संजय राऊत यांनी थेट भाजपला प्रश्न केला आहे. कर्नाटकच्या विधानसभेत रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा गौरव केल्याचं राऊत म्हणाले आहेत.

भाजपने मंत्री अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. असं असेल तर आधी भाजपने राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा, असं राऊत यांनी म्हटलं आहे. परिणामी हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. भाजपनं या भानगडीत पडण्याची गरज नाही, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, मालाडच्या मैदानाच्या नामकरणावरून राज्यात हिंदू-मुस्लीम दंगलीसारखं वातावरण तयार होवू नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”

“दोन व्यक्तींची मनं आता नितीन गडकरीच जुळवू शकतात”

न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत’; राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं

 “…तर राज्य सरकार चालवायची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”