मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडल्यानंतर बंडखोर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला हे पत्र शेअर केलं आहे. यात त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठे मिळालीच नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे पत्र लिहिलं असल्याचं आमदारांनी सांगितलं आहे.
मतदारासंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्ही बोलावलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन उचलायचे नाहीत. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही. किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचलीसुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला, असं संजय शिरसाट यांनी पत्रात सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता
शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ
‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल
उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल!
“आमचा विठ्ठल चांगला, अवतीभवतीच्या बडव्यांमुळे आमचा विठ्ठल बदनाम होतोय”