पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीने देखील लोकसभेच्या आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांपैकी सर्वाधिक चर्चेत असणारे खासदार म्हणजे उदयनराजे भोसले. पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी ते चांगलेच प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी एका बाजूला आणइ उदयनराजे एका बाजूला असं चित्र असतं. आता मात्र उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार की नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. साताऱ्यातील आमदारांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका यासाठी घेतल्याचं कळतंय.
नेमका काय प्रकार घडला?
उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लढण्यासाठी भाजपसह इतर पक्षांच्या ऑफर आहेत. मात्र उदयनराजेंना राष्ट्रवादीकडूनच तिकीट हवं असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी यासाठी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आज उदयनराजेंचे पक्षांतर्गत विरोधक असलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर आणि शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील बारामतीत पोहोचले होते. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली-
शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र खासदार उदयनराजे यांच्या तक्रारींचा पाढा शरद पवार यांच्यापुढे वाचण्यात आल्याचं कळतंय.
पवारसाहेब, उदयनराजेंना तिकीट देऊन नका. इतर कुणालाही तिकीट द्या. तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्याला आम्ही निवडून आणतो, अशी भूमिका उदयनराजेंच्या विरोधकांनी शरद पवार यांच्यापुढे मांडल्याची माहिती आहे.
उदयनराजेंऐवजी कुणाला मिळणार तिकीट?
खासदार उदयनराजे भोसले यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा हीच भूमिका असल्याचं कळतंय. साताऱ्यातून कुणाला उमेदवारी द्यायची याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार यांचा असणार आहे. त्यामुळे उदयनराजे की श्रीनिवास पाटील यापैकी शरद पवार कुणाची निवड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उदयनराजेंचा थेट शरद पवारांना इशारा-
साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना स्वतः उदयनराजे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरेसी बोलकी आहे. फसवाफसवी केली तर बघून घेऊ, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला होता.