फोटो फिचर

जिमवाल्याने अपमानित करून बाहेर काढलं, आता आमिर या पठ्ठ्याला म्हणतो, ‘बॉडी असावी तर अशी…!’

अक्षय आढाव, प्रतिनिधी |  सातारा जिल्ह्यातला गोंदवले गावचा रोहित बनसोडे नावाचा तरूण… शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेला. कॉलेज संपल्यानंतर काय करायचं मग आपल्याला जिममध्ये जाता येईल, असा विचार करून तो वडिलांसोबत जिममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गेला. परंतू जिम मालकाने वडीलांदेखतच त्याचा घोर अपमान करून त्याला पैशाच्या कारणास्तव बाहेर काढलं. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला… मग सुरू झाला प्रवास, रोहित बनसोडे ते बॉडीबिल्डर रोहित बनसोडे…..!

 

 

जिममधून अपमानित होऊन बाहेर पडल्यावर आपण अशी तब्येत करायची की लोकं म्हटली पाहिजेत तब्येत असावी तर अशी… असा निर्धार रोहितने केला. मग सकाळी पाच-साडेपाचला उठून घरासमोरच्या डोंगरावर व्यायामाला जायला सुरूवात केली…. धावायला सुरूवात केली… झाडाला लोंबकळायला सुरूवात केली…. यामुळे रोहितच्या शरीरात बदल जाणवू लागले….

 

 

रोहितने आपल्या वडिलांच्या सल्ल्याने डोंगरावर असणाऱ्या किंवा माळरानावर असणारे 15 ते 20 किलो वजनाचे दगड खांद्यावर घेऊन 10 ते 12 फूट लांब फेकायला सुरूवात केली.. दिवसभरातून तो रोज असा प्रकार 40 ते 50 वेळा करू लागला. यामुळे रोहितचे दंड आणि छाती फुगू लागली…

 

 

तब्येत कमावण्यासाठी रोहितने काही विशेष आहार घेतला नाही कारण घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याला फळं खाणं, दूध पिणं किंवा सप्लिमेंट खाणं परवडणारं नाही, हे त्याने जाणलं. मग रोहितची आई सकाळी रोहितला लवकर जेवणं लागतं म्हणून रात्रीच रोहितसाठी जेवण बनवून ठेवायची… रोहितने 5 साडेपाचला उठून व्यायाम केला की सकाळी साडे सहा वाजता त्याचं पहिल्या वेळचं जेवण असतं. मग घरच्यांबरोबर परत 10 वाजण्याच्या सुमारास तो जेवण करतो… परत दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी 5 वाजता तो जेवण करतो. तसंच संध्याकाळी 9 वाजता घरच्यांबरोबर तो जेवण करतो. दिवसातून तो 5 वेळा जेवण करतो.

 

 

व्यायाम करताना आजूबाजूला सगळा निसर्ग भकास जाणवायचा…. नजर जाईल तिकडे नुसतं माळरान… मग रोहितने हेच उजाड माळरान हिरवंगार करण्याचा चंग बांधला… आमिर खान यांचा ‘सत्य मेव जयते’ या कार्यक्रमातली चिमणीची कथा ऐकली आणि ती कथा पाहून प्रेरित झालो… दुष्काळाची आग कायम कायमची मिटावी, म्हणून प्रयत्न करायला सुरूवात केल्याचं रोहित सांगतो. त्यातूनच त्याने आणि त्याच्या बहिणीने विहीर खोदली…. चारी खोदल्या… त्यात पाणी जिरवलं… अन् मग हजारो झाडं लावली आणि डोक्यावरून पाण्याचे कॅन वाहून ती झाडं जगवलीसुद्धा.. या कामात त्याला त्याची बहीण रक्षिताची त्याला मोलाची साथ मिळाल्याचं रोहित सांगतो.

 

 

गावात पडलेला दुष्काळ नुसता पाहत बसण्यापेक्षा आपण जर श्रमदानाच्या कामात झोकून द्यायला सुरूवात केली तर आपण गावाचं रूपडं पालटू शकतो, असा त्याने निर्धार केला. झाडं लावण्याबरोबर ती जगली पाहिजेत, असा मानस ठेऊन त्या दृष्टीने त्याने काम केलं… तसंच मुके जीव पाण्यावाचून तडफडत असतात. त्यांना दोन घोट पाणी मिळावं म्हणून रोहितने खास त्यांच्यासाठी विहीर खोदली.

 

 

या सर्व कामातून आणि पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून रोहितची अभिनेते आमिर खान यांची पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये भेट झाली. रोहितला पाहिल्याबरोबर व्वा ….. तब्येत असावी तर अशी, असं आमिर खान म्हणाल्याचं रोहित सांगतो. आमिर खान यांनी स्तुती केल्यावर आभाळ ठेंगण झालं होतं, अशी भावना रोहितने व्यक्त केली. तसंच आमिर खान यांनी घरी येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही रोहितने बोलताना सांगितलं.

 

घरची परिस्थिती गरिबीची… रोज करीन तेव्हा खाईल, अशी कुटुंबावर वेळ…. आई घरकाम करते तर वडिल गवंडी काम करतात… रोहित सध्या कला शाखेच्या प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. पुढे भारताच्या सैन्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न असल्याचं रोहित सांगतो.. जिवंत असेपर्यंत काळ्या आईची आणि भारतमातेची सेवा करण्याची भावना बोलून दाखवताना देशभक्तीची व्याख्या काय असते, हे रोहित नकळतपणे सांगून जातो.

 

 

तरूण पिढीकडे पाहिलं तर सध्याचे तरूण (अपवाद वगळता) व्यसनात अडकले आहेत. तसंच अनेक नादाच्या पायी ते आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष वाया घालवताना पाहायला मिळतात. पण मला त्यांना सांगायचंय की ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि त्या दृष्टीने मेहनत करा, जगात काहीच अशक्य नाही, असा संदेश रोहितने आजच्या तरूण पिढीला दिलाय. तसंच मी जीवनभर निर्व्यसनी राहणार आहे, असं सांगत तरूण पिढीनेही व्यसनाकडे वळू नये, अशी कळकळीची विनंती रोहितने केली आहे.

 

 

आजपर्यंत कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाही. पण जर कुणी आम्हाला मदत केली किंवा मदत मिळाली तर रोहितने पाहिलेली आभाळभर स्वप्न पूर्ण करण्याला तुमचा मदतीचा हात लागेल तसंच आमच्या कामाला देखील हुरूप येईल, असं रोहितने आणि त्याचे वडिल शंकर बनसोडे यांनी सांगितलं.