“मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभं राहावं, मग त्यांना विरोधीपक्षनेता दिसेल”

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

आगामी निवडणुका मित्रपक्षांना घेऊनच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून वंचित बहुजन आघाडी बरोबर अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

कार्यक्रमानंतर थोरातांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, असं वक्तव्य केलं. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी नेहमीच चुकीची ठरली आहे, असं सांगत त्यांनी आरशासमोर उभं रहावं, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल, असं थोरात म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र बनवण्याची घोषणा केली आहे. या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता होण्यासाठी जेवढ्या जागा लागतात तेवढ्याही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या निवडून येणार नाहीत, असं मुख्यमंत्री प्रत्येक सभेत सांगत आहेत. त्यालाच थोरात यांनी उत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या-