पुणे महाराष्ट्र

शरद पवारांची चाणाक्ष खेळी; भाजपला ती संधी दिलीच नाही!

पुणे : पुणे महापालिकेच्या अद्ययावत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली नाही. त्यांच्या गैरहजेरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. पवारांच्या या चाणाक्ष खेळीमुळे भाजपची मात्र एक संधी हुकली आहे. 

महापालिकेच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे तसेच महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते. या कार्यक्रमात पाहुण्याचं स्वागत पुणेरी पगडी घालून करण्यात आलं. सत्ताधारी भाजपने तसा ठरावच केला होता, असं कळतंय. 

शरद पवार यांनी नुकतंच राष्ट्रवादीच्या सभेत पुणेरी पगडी नाकारत फुले पगडी वापरण्याचा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर या पगडी राजकारणावरुन मोठं वादंग निर्माण झालं होतं. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. 

महापालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपला शरद पवारांवर कुरघोडी करण्याची संधी चालून आली होती. शरद पवारांच्या डोक्यावर पुणेरी पगडी चढवायचीच असा विचार सत्ताधाऱ्यांचा होता, मात्र चाणाक्ष पवारांनी वेळीच ही खेळी ओळखत कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या या खेळीमुळे सत्ताधाऱ्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.