‘सामना’मधून शरद पवारांवर टीकेचे बाण; शरद पवार म्हणतात….

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारांबाबत वक्तव्य केलं होतं. मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येतील, तेव्हा एनडीविरोधातील नेत्यांमधील एक सर्वसामान्य चेहरा पंतप्रधानपदाचा नवा दावेदार आहे, असं भाकीत त्यांनी केलं होतं.

शरद पवारांच्या या वक्तव्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

सामनामध्ये नेमकं म्हटलंय तरी काय?-

-शरद पवारांनी काँग्रेसविरोधात दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना आणि नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करुन त्यांनी बंड पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला.

-आताही आवळ्या-भोपळ्यांची मोट बांधून काही नविन घडवता येईल का? या भूमिकेत शरद पवार आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन नावे जाहीर केली. आता चौथं नाव नजरचुकीने राहून गेलं ते राहुल गांधी. स्वत: पवार पाचवे आहेत. 

-अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीच्या रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. आजचीच घडी कायम राहील. घडी विस्कटावी असं वातावरण देशात नाही.

सामनातील टीकेवर शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली?-

ज्यांनी कोणी ही बातमी छापली त्यांनी मला प्रश्न विचारला की, राहुल गांधींशिवाय आणखी कोण कोण लोक पंतप्रधान होऊ शकतात?, ते म्हणाले तुमच्याकडे नाहीत. मी म्हटलं लोक खूप आहेत. आणि मग त्यापैकी दोन-तीन नावं मी घेतली. यापेक्षा काही नाही. आज कोणाला तरी टाळलं असं काही नाही. टीआरपीसाठी कोणी केलं असेल तर माझी हरकत नाही- शरद पवार

दरम्यान, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, असंही शरद पवार यांनी सामनामधून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना स्पष्ट केलं आहे.