मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात कारण त्यांच्यावर नागपुरचे संस्कार आहेत- शरद पवार

औरंगाबाद |  जसजशी निवडणूक जवळ येतीये तसतशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधिक वेगात झडायला सुरूवात होतीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय. मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात कारण त्यांच्यावर नागपुरचे संस्कार आहेत, अशी बोचरी टीका पवारांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेत पवारांवर पाकिस्तानच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. त्यावरच मुख्यमंत्री नाशिकला काय बोलले त्याने फरक पडत नाही. कारण ते काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर नागपूरचे संस्कारच आहेत. त्यामुळे हे फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगायची गरज नाही, असा टोला पवारांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका मी समजू शकतो पण पंतप्रधानांनी जरा विचार करून बोलायला हवं होतं, असंही ते म्हणाले.

आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी इथं सांगतात मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे, असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला.

दररम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मराठवाड्याचा दौरा त्यांनी पूर्ण केला.

महत्वाच्या बातम्या-