…अन् तावातावानं पुढं आलेल्या त्या तरुणाची शरद पवारांनी घेतली फिरकी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त काल त्यांनी मुंबईमध्ये मतदान केलं आणि त्यानंतर लगेचच दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केली. दुष्काळ दौऱ्यासाठी शरद पवार थेट सोलापूरला रवाना झाले.

सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे चारा छावणीतील शेतकऱ्यांसोबत शरद पवार यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्यांनी त्यांनी या भेटीत जाणून घेतल्या.

शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना एक अजब प्रकार घडला. या प्रकाराची सध्या एकच चर्चा सुरु आहे.

नेमका काय आहे हा प्रकार???

शरद पवार दुष्काळ पाहणीसाठी सांगोल्यात आले होते. तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे त्यांनी एका चारा छावणीला भेट दिली. यावेळी इथं काही शेतकरी उपस्थित होते. देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांना कोणी ओळखत नसेल असं होऊच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याभोवती गर्दी केली.

शेतकरी आपल्या समस्या शरद पवार यांच्या कानावर घालत होते. शरद पवारसुद्धा त्या समस्या लक्ष देऊन ऐकत होते. मात्र गर्दीतील एक तरुण थेट शरद पवार यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणानं शरद पवार तसंच उपस्थितांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यात यश मिळवलं.

काय चाललंय कळण्याआधीच त्या तरुणाने शरद पवार यांच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडायला सुरुवात केली. मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, अशी या तरुणाची तक्रार होती.

संबंधित तरुणाचा आवेश पाहता हा काय प्रकार आहे हे शरद पवार यांच्या चांगलंच लक्षात आलं. हा तरुण  हातात घड्याळ आणि गाडीची चावी कमरेला लावून आला होता. शरद पवार यांनी या तरुणावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

“चावी  कशाची आहे?, कोणत्या गाडीची आहे? घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे?” असे प्रश्न शरद पवार यांनी या तरुणाला विचारले. तरुणाकडे असलेली चावी बुलेट गाडीची असल्याचं त्याने सांगितलं, मात्र पवारांच्या प्रश्नांनी हा तरुण चांगलाच हबकलेला दिसला. 

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पवारांचं आश्वासन-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. मुंबईत लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर त्यांनी सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

एका शेतकऱ्याने तक्रार केली, की फक्त 5 जनावरांना छावणीत प्रवेश आहे. सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, अशी विनंती त्याने शरद पवार यांच्याकडे केली.

रोज 15 किलो चारा मिळतो, मात्र जनावरांना अधिक चारा मिळावा. 2 हजार लिटर दूध संकलन होतं. त्या यलमार मंगेवाडी गावात आता दूध संकलन 200 लिटरवर आलं आहं, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

गावातील पोरं बाहेर शिक्षणाला किती आहेत?, अशी विचारणा शरद पवारांनी शेतकऱ्यांकडे केली. दुष्काळामुळे शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करु, असं पवारांनी शेतकऱ्यांना सांगितलं.