भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुंबई | देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे.

गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब, या पाच राज्यातील विधानसभेच्या तब्बल 690 जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. परिणामी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

सध्या निवडणूक जाहीर झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकाच राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्ष आणि काॅंग्रेस भाजपच्या साम्राज्याला हादरा देण्याची तयारी करत आहेत.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दुर राखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. आताही पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रावादी पक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. परिणामी शरद पवार यांनी आता आपला मोर्चा भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांकडं वळवला आहे.

गोव्यात परिवर्तन होणार आहे. सध्या गोव्यातील जनमत भाजपच्या विरोधात असून राष्ट्रवादी काॅंग्रेस तृणमुलसोबत चर्चा करत आहे. अशावेळी गोव्यात महाविकास आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष समाजवादी पक्षासोबत युती करत निवडणूक लढवणार आहे. परिणामी राष्ट्रवादी उत्तर प्रदेशात किती जागांवर निवडणूक लढवणार हे  पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस मणिपूरमध्ये पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी देशभर प्रयत्न करत असल्यानं याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

भाजपविरोधात राष्ट्रवादी सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आमची आघाडी भाजपला पर्याय ठरणार असल्याचं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीसोबतच उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. परिणामी विरोधी पक्षांनी चहुबाजूंनी भाजपला घेरल्यानं भाजपची कोंडी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत”