Top news देश

“मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच…”; ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

sharad pawar
Photo Credit: Twitter/@Pawarspeaks

नवी दिल्ली | केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ज्ञानवापी मशिदीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरुन वातावरण खराब करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं जात आहे, असं शरद पवार म्हणालेत.

वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे. मागील 300-400 वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही, असं शरद पवार म्हणाले.

अयोध्येचा विषय संपल्यानंतर देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल असं आम्हाला वाटत होतं. मात्र भाजपचे विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशाप्रकारची आणखी प्रकरणं समोर आणून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय.

मोदी सरकार आणि भाजपा आज देश चालवत आहे. त्यांचा अजेंडाच हा आहे की एक विषय संपल्यावर दुसरा विषय समोर आला. काहीही करुन देशात कायम हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चनांमधील बंधुभाव संपावा आणि आपल्याला संप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू आहे, अशी टीका पवारांनी केलीये.

देशासमोरील आजच्या खऱ्या समस्या महागाई, बेरोजगारीसारख्या आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हावं या हेतूने सांप्रदायिक विषयांना हवा दिली जात आहे, असं पवारांनी सांगितलं.

या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा देशालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. ताजमहालसारखी वस्तू आपल्या देशाची ओळख आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार 

“बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, मला वाटतं की हा ब्रह्मदेवाला चुकवून…” 

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली!

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं; मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच केली हकालपट्टी