बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसने नेते शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेची संधी दिली आणि आज ते बिनविरोध निवडून देखील आले आहेत. यानंतर त्यांनी सद्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे.

मला कल्पना आहे की कोरेगाव, जावळी, सातारा जिल्हा ,नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते व माथाडी कामगारांमध्ये उत्साह आहे. पण जगासह देशात, महाराष्ट्रात आलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेता आपण कुठंही बॅनर, फटाके व तशा प्रकारच्या कुठलाही आनंद व्यक्त न करता त्या पैशातून गरीब लोकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या प्रेमाने विधानपरिषदेचा अर्ज दाखल केला आणि बिनविरोध निवड झाली. मला दिलेल्या संधीबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहात राज्यातील कामगार, शेतकरी व कष्टकरी लोकांसाठी कार्य करत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच नवनिर्वाचित सदस्य म्हणून सोमवारी सभापतींच्या अध्यक्षतेखाली शपथ घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत गुपचूप उरकली बैठक, ‘या’ विषयावर चर्चा झाल्याची शक्यता

-…म्हणून मला उमेदवारी दिली नसेल- चंद्रशेखर बावनकुळे

-पायी जाणार्‍या मजुरांना पाणी, जेवण उपलब्ध करून द्या; आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

-…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

-“२ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही”