भाजपला आता हिंदुत्व आणि राम मंदिर नकोसं वाटत आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेनेनं आपल्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप जात, गोत्र, धर्म, आई-वडील हेच मुद्दे चर्चेला आणत आहे. नोकऱ्या, भूक, महागाई, दहशतवाद यासारख्या मुद्द्यावर का गप्प आहे? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. भाजपला हिंदूत्व आणि राम मंदिरही नकोसं झाल आहे, अशी कडवट टीका भाजपवर केली आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला कर्जमाफी  आश्वासन दिलं आहे. त्याप्रमाणे 2014 साली नरेंद्र मोदी यांनीही अनेक आश्वासनं दिली होती. ती सर्व जूमला होती हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे जनतेला मुर्ख बनवण्याचे धंदे सोडून द्या, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

-सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला दिलं आहे. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी हेच सूर्य-चंद्र जनतेला आणून देण्याचं वचन दिलं होतं. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. मग मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी अवलंबला तर काय बिघडलं? असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

-सध्या जात, गोत्र, धर्म, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकऱ्या, भूक, महागाई, दहशतवाद यावर कोणाला बोलावसं वाटत नाही. आता सरकारला हिंदूत्व आणि राम मंदिरही नकोसं झाल आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

-निवडणुका लढवण्यासाठी फाटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचे काम सुरू आहे. पण त्यामुळे जनतेला उब मिळेल काय? निवडणुकीत आपण दिलेली आश्वासनं ‘जुमलेबाजी’ ठरू  नयेत यासाठी सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी भरमसाठ आश्वासनं दिली जातात व सत्ता मिळताच त्यांचा विसर पडतो. जनतेला मुर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत, अशी कडवट टीका सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे.

-काँग्रेसने आपल्या कालखंडात काही केले नाही म्हणून आपल्या 5-10 वर्षाच्या कालखंडातही काही करायचं नाही आणि जे काही वाईट झालं त्याचं खापरही मागच्यावर फोडायचं ही राजकीय संस्कृतीच देशाला घातक, मारक ठरतं आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

-या देशाला एकमेव धर्म आहे तो हिंदू धर्म. याचा अर्थ येथे इतर धर्मांना स्थान नाही असा अजिबात नाही. हिंदुत्व ही एक संस्कृती आहे. त्यामुळे या देशाला मातृभूमी मानणारे सगळेच जण हिंदू संस्कृतीचे घटक आहेत. मग ते कोणत्याही धर्माचे असोत. प्रत्येक धर्माचे हा देश घडवण्यात योगदान आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

-देशाला भोके पडत आहेत. या भोकांची भगदाडे पडू नयेत यासाठी हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. लोक जातीपातीचे झेंडे घेऊन मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. हा आजपर्यंत ज्यांनी राज्य केलं त्यांच्या धोरणांचा, योजनांचा आणि अर्थकारणाचा पराभव ठरतो, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.