श्रीपाद छिंदम म्हणतो, “मला बंदुकधारी पोलिसांचं संरक्षण द्या”

अहमदनगर | अहमदनगर महापालिकेतला तत्कालिन भाजप नगरसेवक श्रीपाद छिंदम याने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. समाजाच्या सर्व स्तरातून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजपने त्याला पक्षाूतन तात्काळ निलंबित करावं, या मागणीसह विरोधी पक्षांनी अनेक आक्रमक आंदोलने केली. या मागणीसाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. अशातच अहमदनगर महापालिकेची निवडणुक जाहीर झाली. श्रीपाद छिंदमला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्याला निवडणुकीच्या काळात तडीपार म्हणुन घोषित केलं गेलं होतं. श्रीपाद छिंदम अपक्ष म्हणून उभा राहिला आणि आश्चर्य म्हणजे निवडणुक काळात तो त्याच्या प्रभागात हजर नसूनसुद्धा निवडून आला.

कोण आहे श्रीपाद छिंदम??

श्रीपाद छिंदम हा तत्कालिन अहमदनगर महानगरपालिकेचा उपमहापौर होता आणि नुकत्याचं झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकात प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष म्हणून नगरसेवकपदी विराजमान झाला आहे. निवडून येताच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि सर्व महापुरूषांना हार घालत त्याने आपला विजय जनतेला समर्पित केला.

काय आहे श्रीपाद छिंदमची मागणी??

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या शुक्रवारी निवडणुक होत आहे. या निवडीसाठी श्रीपाद छिंदमला महापलिकेत हजर रहायचे आहे. महापौर निवडीच्या दिवशी श्रीपाद छिंदमला संपूर्ण दिवस बंदूकधारी पोलिसाचं संरक्षण हवं आहे. या मागणाचा रितसर अर्जही श्रीपाद छिंदमने पोलीस अधिक्षकांना दिला आहे.

श्रीपाद छिंदमच्या मागणीवर पोलिसांचं पाऊल

निवडणुकीच्या दिवशी महापालिकेत येण्यासाठी श्रीपाद छिंदमला पोलीस संरक्षण हवे आहे. या मागणाचा रितसर अर्ज श्रीपाद छिंदमने पोलीस अधिक्षकांना सोमवारी दिला आहे. मात्र अहमदनगर पोलिस प्रशासनाने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीय.