…म्हणून रतन टाटांनी ‘या’ गाडीला दिलं चक्क मराठी माणसाचं नाव; रेकॉर्डब्रेक विकली गेली गाडी!

नवी दिल्ली | ऑटोमोबाईल क्षेत्रात एका व्यक्तीचे नाव खूपच आदराने घेतले जाते. ते नाव आहे रतन टाटा यांचे… प्रयोगशील उद्योगपती म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. एकदा कामानिमित्त गाडीतुन जात असताना त्यांनी एका दुचाकी गाडीवर ४ जण पाहिले आणि त्यांनी यावर विचार केला. तेव्हा त्यांच्या संकल्पनेतून टाटा नॅनो ही गाडी अस्तित्वात आली. २००८ मध्ये त्यांनी सामान्य लोकांपर्यंत गाडी पोहोचवण्याच्या उद्देशाने नॅनो गाडी बनवली होती.

टाटा मोटर्सची सर्वात प्रसिद्ध असलेली आणि लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेली गाडी टाटा सुमो आहे. या गाडीच्या नावाबाबत लोकांच्या मनात कायम शंका येते की, या गाडीचे नाव त्या गाडीच्या आकारानुसार ठेवले असेल. पण ही गोष्ट खरी नाही. या गाडीचे नाव ठेवण्यामागे एक खूपच खास गोष्ट आहे.

टाटा समूहाने १० सीटर गाडीचे नाव टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुमंत मुळगांवकर (Sumant Moolgaonkar) यांच्या नावावरून ठेवले आहे. त्यांच्या नावाचे पहिले अक्षर आणि आडनावाचे पहिले अक्षर असं मिळून ‘सुमो’ (SUMO) नाव ठेवण्यात आले आहे.

Sumant Mulgaonkar
सुमंत मुळगावकर

टाटा मोटर्ससाठी हे नाव लकी ठरलं आहे. कारण टाटा सुमो गाडीची खूपच जास्त प्रमाणात विक्री झाली. गाडी फिरायला घेऊन जाण्याच्या उद्देशाने आणि मोठ्या गाड्यांचे शौकीन असलेल्या व्यक्तींनी टाटा सुमो गाडीला विशेष पसंती दिली. पहिले कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणारे टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या कामाचा हा एक मोठा नमुनाच आहे.

सैनिकांच्या उपयोगासाठी आणि ऑफ रोड वाहतुकीचे उद्दिष्ट ठेवून १९९४ मध्ये टाटा सुमो ही गाडी लाँच केली होती. पण त्यांच्या लाँचिंगनंतर या गाडीच्या विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत होती. १९९७ मध्ये एक लाखापेक्षा जास्त गाड्यांची विक्री झाली.

टाटा मोटर्स ही जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. जेआरडी टाटा यांनी १९४५ मध्ये टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीची (टेल्को) स्थापना केली होती.

पुढे जाऊन टेल्कोचे नाव टाटा मोटर्स या नावाने ओळखू जाऊ लागले. १९५४ मध्ये जर्मनीतील सर्वात मोठी गाड्या बनवणारी डाइम्लर बेंजसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये टाटा मोटर्स कमर्शिअल वाहन क्षेत्रात उतरली होती.

टाटा मोटर्सने भारतात १९९८ मध्ये पहिली स्वदेशी इंडिका गाडी बनवली. १९९८ मध्ये जिनेव्हा मोटर शोमध्ये टाटा मोटर्सने ही गाडी पहिल्यांदा लाँच केली होती. त्यानंतर काही दिवसांनी इंडियन ऑटो एक्स्पोमध्ये इंडिका गाडी लाँच करण्यात आली होती. या गाडीलाही चांगलाच प्रतिसाद मिळाला.