Top news आरोग्य तंत्रज्ञान देश

मित्रांच्या मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्याचे गिफ्ट; सोनू सूदही मदतीसाठी धावला

नवी दिल्ली | तुम्हाला ‘शोले’ चित्रपटातील जय आणि विरु यांची जोडी तर आठवतच असेल. त्यांची मैत्री पाहिल्यावर वाटते की, आपल्यालाही असे जिवाला जीव देणारे मित्र असावेत. ही झाली चित्रपटातील घटना. मात्र, चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या मैत्रीलाही लाजवेल अशीच  एक घटना नुकतीच घडली आहे.

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील डिनोबिली या शाळेतील काही मित्र एकत्र बसायचे आणि मस्ती करायचे. पण एक दिवस त्या मित्रांना समजले की, त्यांच्याबरोबर शिकणारा अनुप कुमार वर्णवाल हा तीव्र यकृत रोगाशी झुंजत आहे. यावर डॉक्टरांनी सांगितले की, लवकरात लवकर उपचार झाला नाही तर काहीही होऊ शकतं.

या उपचारासाठी तब्बल 28 लाख रुपयांची गरज होती. एवढ्या जास्त पैशांमुळे अनुपची तीन वेळा शस्त्रक्रिया टळली होती. कारण अनुप यांच्या घरातील परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ते एवढे पैसे जमा करू शकतील. अनुप यांचे वडील प्रदीप वर्णवाल हे बरटांड मधील एलआयसी कार्यालयासमोर फळ विक्री करायचे आणि आई किरण देवी या गृहिणी होत्या.

अनुप हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मग अनुपच्या काही मित्रांनी मिळून आपल्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी जमतील ते प्रयत्न करण्याचा विडा उचलला. पण एवढे पैसे नेमके कुठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. मग त्या सर्वांनी आपापल्या मित्रांकडून, सोशल मीडियावरून तसेच ओळखीतील व्यक्तींकडे मदत मागायला सुरू केली.

सर्वांनी दिवस-रात्र एक करून 20 दिवसांत तब्बल थोडे नाही तर 14,45,440  रुपये जमा केले. काही पैसे अनुपच्या कुटुंबानेही जमा केले. त्यानंतर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात अनुप उपचार घेत होता. तिथे अनुप यांच्या उपचारासाठी रोज 48 हजार रुपये खर्च व्हायचे. सर्व ठिकाणाहून मदत आल्यावर फक्त 5 लाख रुपयांची गरज होती.

मग त्यांच्या मित्रांपैकी अक्षीका सिंह यांनी अभिनेता सोनू सूद यांना अनुपच्या आजाराविषयी सांगितले. सोनू सूद यांनी जराही विलंब न करता 5 लाख रुपयांची मदत पाठवून दिली. यानंतर 30 सप्टेंबर रोजी अनुप यांचे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. यासाठी अनुप यांच्या आई किरण देवी यांनी आपल्या मुलाला यकृत दिले.

अखेर सर्व मित्रांच्या प्रयत्नांना यश आले, त्यांच्या आनंदाचा ठिकाणाच राहिला नाही. नुकतेच हे सर्वजण 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. या मदतीसाठी त्यांनी ‘सपोर्ट फॉर अनुप’ ही मोहीम सोशल मीडियावर चालवली होती. अनुपच्या उपचारासाठी डिनोबिली शाळेबरोबर अन्य शाळेतील शिक्षक, विद्यार्थी वर्ग, सोसायटी इत्यादी सर्वांनी भरभरून मदत केली.

सोशल मीडियावर ‘सपोर्ट फॉर अनुप’ या मोहिमेचे संयोजन विश्रुत वीरेंद्र यांनी केले होते. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स ॲप, ट्विटर आणि प्रत्यक्ष फोन करून अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. या सर्व मित्रांनी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्याचे बोल तंतोतंत सिद्ध करून दाखवले, यात तिळमात्र शंका नाही.

 

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी आता अमित शहांनी देखील सोडलं मौन; महाराष्ट्र सरकारवर आरोप करत म्हणाले..

‘केबीसी’तील अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ प्रसिध्द डायलॉग कोणी लिहिला आहे? वाचा सविस्तर

कौतुकास्पद! या जोडप्यानं लग्न खर्च वाचवून तब्बल 500 श्वानांना केली ‘अशी’ मदत

काय सांगता! कोरोनाकाळात तब्बल ‘एवढ्या’ सायकली विकल्या गेल्या

बिहारच्या गरजू मुलींना सॅनिटरी पॅड मिळावं म्हणून युवतींनी मिळून केलं ‘हे’ काम