लखनऊ : एका दलित तरुणाशी मी लग्न केल्यामुळे माझे वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे, असं म्हणत उत्तर प्रदेशमधील भाजप आमदाराच्या मुलीचा व्हीडिओ शेअर केला आहे.
माझे वडिल मला मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने केली आहे.
राजेश मिश्रा हे उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील बिठारी चैनपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या मुलीने अजितेश कुमार या तरुणाशी विवाह केला असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
अजितेश कुमार आणि त्याच्या कुटुंबापासून लांब रहावे. त्यांना त्रास देऊ नये. वडिलांनी आम्हाला मारण्यासाठी गुंड पाठवले आहेत. त्यांच्याकडून आमच्या जीवाला धोका आहे, असं साक्षीने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, साक्षीच्या व्हीडिओवर भाजपने कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. मी हा व्हीडिओ पाहिला आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना संबंधित दाम्पत्याला सुरक्षा पुरवण्यास सांगितलं, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक आर. के. पांडे यांनी दिली आहे.