काँग्रेसच्या त्या आमदारांना सुप्रीम कोर्टाने खडसावलं

नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने चांगलं खडसावलं आहे. काँग्रेसच्या आमदारांनी लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर करून आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

मुंबईत आलेल्या कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे मंजूर करून घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. 

सुप्रीम कोर्टाने दहा बंडखोर आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आमदारांना सुरक्षा देण्याचे आदेश कोर्टाने कर्नाटक पोलिसांना दिले आहेत. 

विधानसभेचे अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांना ते मंजूर करण्याचे आदेश द्यावे, असं या आमदारांनी म्हटलं आहे. 

आम्ही स्वखुशीने राजीनामे दिले असल्याने पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघनाचा प्रश्न येत नाही. यामुळे काँग्रेसने आम्हाला अपात्र घोषित करण्यासाठी केलेला अर्ज निरर्थक असल्याचं आमदारांनी म्हटलं आहे.