‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक

मुंबई | अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. सिंधुताई यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, कला अशा सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पडद्यावर सिंधुताईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सिंधुताईंच्या निधनानंतर भावूक झाली आहे. सिंधुताईंच्या निधनाची बातमी कळताच काही क्षण पायतली ताकदच गेली,अशी प्रतिक्रिया तेजस्विनी पंडितने दिली आहे.

अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहिलं नाहीस, पोस्ट केलं नाही?, पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांना, असं तेजस्विनी पंडीतने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मन:स्थिती आणि वेळ खरंच असतो का?, असा सवाल तेजस्विनीने उपस्थित केला आहे.

माई आणि मी रोज संपर्कात होतो असं नाही. पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे याचं त्यांना भानही नसतं, असं तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटायचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता बाळा म्हणणाऱ्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. माझा चित्रपट बघून कायम म्हणायच्या मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस, अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली आहे.

‘एक व्यक्ती म्हणून मी त्यांचा अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर दाखवू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच. कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.

महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला. पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल आणि तुमच्यावर आधारित चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील’, अशी भावनिक पोस्ट तेजस्विनीने केली आहे.

घाई घाईने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या, अशी विनंती देखील तेजस्विनी पंडीतने केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे -देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आज लॅाकडाऊन होणार?, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता

हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवता होती- उद्धव ठाकरे

विमान प्रवाशांसाठी निर्बंध अधिक कठोर, वाचा सुधारीत नियमावली

उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं, त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं- नरेंद्र मोदी