औरंगाबाद महाराष्ट्र

जळगाव घरकुल घोटाळा: सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह इतरांना शिक्षा!

धुळे : राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह 48 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. धुळे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी शिक्षेची सुनावणी केली. यानुसार शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षाची शिक्षा, 100 कोटींचा दंड तर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा तर राजेंद्र मयूर जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर घोटाळ्याचा निकाल हाती आला आहे.

जळगाव घरकुल घोटाळ्यात 45 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 57 संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उर्वरित 48 दोषींबाबत निकाल हाती आला आहे.

जळगाव घरकुल घोटाळा हे हायप्रोफाईल प्रकरण असल्यामुळे सर्व संशयित आणि त्यांच्या वकिलांना न्यायालयात बोलावण्यात आलं आहे. सुनावणी दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते.

जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचं ठरवलं. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचं कर्ज काढून 11 हजार घरकुलं बांधण्याच्या कामाला 1999 मध्ये सुरुवात झाली.

सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिलं. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदाराला विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

महत्वाच्या बातम्या-