‘तुम्ही ट्विटरवर उत्तर देता ना, तर मग इकडेही द्या’, उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना फटकारलं

मुंबई | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत असल्याचं सांगत त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे. तर वानखेडे यांच्या आरोपावर उद्याच उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने आज मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत.

न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिकांना मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आणि पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना फटकारलं आहे.

नवाब मलिक तुम्ही उद्यापर्यंत तुमचं उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही कोर्टातही उत्तर देऊ शकता, असं न्यायमूर्ती जामदार म्हणाले.

उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना तक्रारदार ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरुद्ध आणखी कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखणारा कोणताही आदेश दिलेला नाही.

ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी न्यायालयाला सांगितलं की, नवाब मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक वक्तव्य केलं जात आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबीयांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत.

आज सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल वक्तव्य करण्यापासून रोखावं, अशी मागणी अर्शद शेख यांनी केली.

ज्ञानदेव वानखेडे आपल्या सज्ञान मुलांच्या वतीने बोलू शकत नाही आणि इतर व्यक्तींनी सोशल मीडियावर काय टिप्पणी केली आहे, याचा दोष मलिकांना देता येणार नाही, असं नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?” 

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?” 

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार

 शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप

‘देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव…’; मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चिमटे