शेतकऱ्याचा मुलगा ते ‘इस्रो’चे प्रमुख थक्क करणारा प्रवास

मुंबई : तमिळनाडूतील सरकारी शाळेत शिकलेला शेतकऱ्याचा मुलगा ते ‘इस्रो’चं प्रमुखपद असा थक्क करणारा प्रवास कैलासवादीवू सिवन यांनी केला आहे. मोहिमेचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करणाऱ्या ‘इस्रो’चे  प्रमुख म्हणून के. सिवन यांची ओळख जगाला झाली. 

के. सिवन हे भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे ते अध्यक्ष, तर अवकाश विभागाचे ते सचिव आहेत. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते माजी संचालक आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिनचा विकास करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना ‘रॉकेट मॅन’  असंही संबोधलं जातं. 

के. सिवन यांचा जन्म 14 एप्रिल 1957 रोजी तमिळनाडूमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. कैलासवादीवू हे सिवन कुटुंबातील पहिलेच पदवीधर होते. तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील तारक्कनविलाई या आपल्या मूळ गावातील सरकारी शाळेत सिवन यांचं शिक्षण झालं. विशेष म्हणजे त्यांचं शालेय शिक्षण हे तमिळ माध्यमातूनच झालं. त्यानंतर नागरकोईलमधल्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली.

सिवन यांनी1980 मध्ये ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून त्यांनी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तर बंगळुरुतील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात 1982 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. आयआयटी बॉम्बेमधून 2007 मध्ये त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली.

चांद्रयान 2 मोहिमेच्या विक्रम लँडरसोबत संपर्क तुटल्यानंतर ‘इस्रो’तील सर्वच शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला होता. इतक्या वर्षांची मेहनत आणि स्वप्न चंद्राच्या उंबरठ्यापाशी पोहचून धूसर झाल्याने सिवन यांनाही गहिवरुन आलं.

महत्वाच्या बातम्या-