मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भिक मागावी लागते याला जबाबदार मराठी प्रेक्षकच; प्रसाद ओक संतापला

मुंबई| एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट बनवले जातात. अनेक चित्रपटांची वर्णी देश-विदेशातील पुरस्कार सोहळ्यातही पहायला मिळते. मात्र काळानुसार आता मराठी चित्रपटांकडे लोकांचा कल कमी होताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांपासून लोक दूरावत चालले आहेत. याचीच खंत व्यक्त करत अभिनेता प्रसाद ओक संतापलेला पहायला मिळाले.

मराठी प्रेक्षक आपल्या चित्रपटांकडे पाठ फिरवतात अशी खंत अभिनेता प्रसाद ओक यानं व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागतेय अशी वेळ येईल असा विचारही केला नव्हता असं दु:ख त्यानं व्यक्त केलं.

मराठी सिनेमांकडे फार कमी लोक वळताना दिसत आहेत. लोक हिंदी सिनेमांना जास्त प्राधान्य देतात. तसेच मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र याला मराठी प्रेक्षकच जबाबदार असल्याचं अभिनेता प्रसाद ओकने म्हटलंय.

लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत प्रसादनं मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला, गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट प्रचंड प्रगती करतोय. निर्मात्यांनी आपलं तंत्र सुधारलं. नवनवे विषय हाताळले जात आहेत. अन् विशेष म्हणजे या चित्रपटांना जागतिक स्थरावर पुरस्कार मिळतायेत. तरी देखील मराठी प्रेक्षक चित्रपटांकडे पाठ फिरवतोय.

मराठी चित्रपट चालत नाही अशी ओरड करण्याआधी मराठी माणसानेच आधी विचार करण्याची गरज आहे. मराठी माणसंचं हिंदीला आधी प्राधान्य देतात. जर महिन्यात तुम्ही एक चित्रपट पाहत असाल तर पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही? मग मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळत नाही किंवा ते चालत नाही याचा आरडाओरड करण्याला अर्थ नाही, असंही प्रसाद ओकनं म्हटलं.

यापुढे तो म्हणाला, सगळ्यात आधी मराठी माणसाने विचार करायला हवा की आपण मराठी सिनेमांना प्राधान्य देतो का? आणि जर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि राजकर्त्यांनीही याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक सिनेमासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि लांच्छनास्पद गोष्ट आहे. प्रसादनं मराठी चित्रपट चालत नाही याला प्रेक्षक देखील तितकेच जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.

प्रत्येक मराठी सिनेमा उत्तम बनत नाही हे मी प्रमाणिकपणे नमूद करतो. मात्र हे हिंदीतही आहे. हिंदीतही प्रत्येक सिनेमा उत्तम बनत नाहीत. तिथेही वाईट सिनेमा असतात. मात्र त्यात मोठी स्टार कास्ट असते, ग्लॅमर असतं, पैसा खर्च केलेला असतो, परदेशात शूटिंग केलेलं असतं त्यामुळे लोकांना त्याच आकर्षण असतं म्हणून ते पाहायला जातात. मात्र त्यावेळेला तुमचं साहित्यावरचं प्रेम कुठे जातं? जयवंत दळवी, बालगंधर्वांवरचं प्रेम कुठे जातं?, असा सवाल प्रसाद ओकने केला आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ‘हिरकणी’नंतर प्रसाद आपल्या दिग्दर्शनातील आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘चंद्रमुखी’ असे त्या चित्रपटाचे नाव असून नुकताच गुढीपाडव्याच्या शुभमुहर्तावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर 5 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्रसादचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक असून त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘दोस्ताना 2’च्या वादानंतर करण जोहरनं सोशल मीडियावरुन…

IPL 2021: हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक, मुंबईचा 13 धावांनी…

पतीपेक्षा वयाने मोठी असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने…

क्या बात है! आता तुरुंगात सुरू होतंय रेडिओ स्टेशन, गुन्हेगार होणार रेडिओ जॉकी

सलग 17 व्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; वाचा आजचा दर