‘कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होऊ शकतो’; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

नवी दिल्ली | कॉंग्रेस पक्षांतर्गत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी चालू आहेत. कॉंग्रेस पक्षात सध्या दोन गट पडले असून एक गट कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबातीलच रहावा अशी मागणी करत आहे, तर दुसरा गट कॉंग्रेसचा नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील असावा अशी मागणी करत आहे. मात्र, तूर्तास तरी सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षपदी राहतील हे नक्की झालं आहे.

अशातच आता कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होऊ शकतो, अशी शक्यता गांधी कुटुंबाचे अगदी जवळचे मानले जाणारे खासदार अहमद पटेल यांनी वर्तवली आहे. अहमद पटेल यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असेल?, ही चर्चा जोर धरू लागली आहे.

सध्या कॉंग्रेस पक्षांतर्गत सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी एक व्यवस्था तयार केली जात आहे. कोरोना महामारीची परिस्थिती आटोक्यात आली की पक्षांतर्गत मतदान घेतलं जाईल. निवडणूक होऊन ज्या नेत्याला अधिक मतं मिळतील तो पक्षाचा अध्यक्ष होईल, असं अहमद पटेल यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशातील राजकारणात कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2014 पासून सलग दोन लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला हार पत्करावी लागली आहे. देशातील काही मोजक्याच राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्ष सध्या सत्तेत आहे. एकूणच मागच्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी अतिशय वाईट आहे.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातील 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होत. पक्षाला मोठ्या बदलाची गरज असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलं होतं. तसेच पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्षाची सध्या गरज आहे, असंही या 23 नेत्यांनी पत्राद्वारे म्हटलं होतं.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी गांधी कुटुंबातीलच अध्यक्ष हवा अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं, अशी विनंती  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर मग आरोग्यमंत्री राजेश टोपेंवरही गुन्हा दाखल करा- सुजय विखे पाटील

…तर सीबीआयला रिया चक्रवर्तीला अटक करावीच लागेल- सुब्रमण्यम स्वामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी या पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली नेते आहेत- कंगणा राणावत

“आमची कृती पक्षाच्या हिताची होती पक्षाविरुद्ध बंड करण्याची नाही”

‘विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने’; नितेश राणेंची राज्य सरकारवर जोरदार टीका