“महिलेचा अपमान करणारी प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतली असूच शकत नाही”

मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जहरी टीका केली होती.

आता नवाब मलिकांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवल्याचं दिसून येतंय. मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्यावर ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता.

त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आणि नवाब मलिकांनी थेट इशारा देखील दिला आहे. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे.

महिलेचा अपमान करणारी प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतली असूचं शकत नाही, असा टोला चित्रा वाघ यांनी नवाब मलिकांना लगावला आहे. ज्या अमृतासाठी स्वतः देवदानवांनी समुद्रमंथन केलं, ते कोणत्याही विष प्रयोगाने विषारी होऊ शकत नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

पुन्हा 1948 चा काळ येत आहे. नवाब मलिकांची ‘रझाकारी‘ मानसिकता पुन्हा डोकं वर काढतेय, असा टोला देखील चित्रा वाघ यांनी लगावला आहे. त्याचसोबत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली आहे.

परमबीर सिंग आयपीएस असले तरी राज्य सरकारच्या सेवेत होते, ते 6 महिन्याहून अधिक काळ गैरहजर होते तर कारवाई करण्यास राज्य सरकारचे हात कोणी बांधले होते?, असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

काशिफ खान ड्रग रॅकेट चालवत होता तर पोलिसांना माहिती का दिली नाही? एकतर महाविकास आघाडी सरकारचा छुपा पाठींबा असेल. नाहीतर गांजा उतरला नसेल, असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून देखील चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याऱ्या सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय राहणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

नवाब मलिकांनी अमृता फडणवीस आणि जयदीप राणा यांचा एक फोटो शेअर केला होता. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर आहे, असं म्हणत मलिकांनी अमृता फडणवीसांवर आक्रमक टीका केली होती.

नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब आहेत. माझ्या अंगावर कोणी आलं की मी त्याला सोडणार नाही, असा इशारा अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिला होता. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून येत्या काळात आणखीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाऊबीजेला भेट म्हणून सुप्रिया सुळे अजित पवारांकडे सिलेंडर मागणार

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, दिवाळीही निघणार तुरुंगात

 “अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय”

  शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला- उद्धव ठाकरे

“ठाकरे सरकारच्या मदतीनंच परमबीर सिंग गायब”