राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेला ‘हा’ नेता थेट तुरूंगातून लढवणार निवडणूक

सोलापूर : राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेले मोहोळचे आमदार रमेश कदम हे तब्बल सव्वा चार वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे मोहोळचा कारभार गेल्या सव्वा चार वर्षांपासून आमदाराविना सुरु आहे. मात्र, रमेश कदम यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते थेट तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत. 

रमेश कदम हे कारागृहात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सध्या रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम मतदारसंघातील लोकांशी संपर्क वाढवत आहेत. मतदारसंघाचा आढावा घेत असताना त्या संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. 

आमदार नसल्याने जनतेसोबतच सत्तेत असलेल्या स्थानिक भाजप नेत्यांचीही मोठी अडचण झाली. त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी पालकमंत्र्यापुढे हात पसरावे लागत आहेत. 

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही मोहोळ राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या काळात लादलेल्या रमेश कदम यांचा विजय झाला होता. त्यानंतर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

रमेश कदम हे आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. नटसम्राट या नाटकातील ‘कुणी घर देता का घर’ हे वाक्य खूप प्रसिद्ध झालं. अशीच काहीशी अवस्था सध्या मोहोळ तालुक्यातील लोकांची झाली आहे. त्यांच्याही मनात सध्या ‘कुणी आमदार देता का आमदार’ सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-