प्रकाश आंबेडकरांसाठी MIMच्या असदुद्दीन ओवैसींनी घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

नांदेड |  देशात सध्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीचं जोरदार वारं वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर काही राजकीय पक्ष आपली नवी बस्तानं बसवण्याच्या तयारीत आहे.

काही दिवसांपूर्वीच जातीयवादी पक्ष असा आरोप असलेला ‘एमआयएम’ आणि गेली दोन दशकं सत्ताकारणापासून वंचित असलेल्या प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करीत ‘बहुजन वंचित आघाडी’ असं नाव देत युती केली. महाराष्ट्रामध्ये मग औवेसींचं येण-जाणं वाढू लागलं. लोकसभा निवडणुकीसाठी जागांची चाचपणी होऊ लागली. आणि मग आपल्याला सुखावणारी परिस्थिती दिसताचं त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ नाही फुटला तरचं नवलं…! मग साहजिकचं प्रचाराचा धुरळा तर उडणारचं… आज नांदेडमध्ये असाच धुरळा उडालेला पाहायला मिळाला. निमित्त होतं नांदेडमध्ये आयोजित केलेल्या भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचं..!

असदुद्दीन ओवैसी यांचं घणाघाती भाषण… नेमकं काय म्हणाले ओवैसी??

आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खा. असदुद्दीन ओवैसी यांनी भाषणाची सुरूवात केली. काँग्रेससह भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसला गेल्या 70 वर्षांचा हिशोब मागायलाही असदुद्दीन औवेसी विसरले नाहीत. त्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा रंग दाखवून दिला.

अशोकराव चव्हाण आपल्या रोजच्या भाषणात सांगत असतात की एमआयएम ही कम्युनल पार्टी आहे. त्यांच्याशी आमचं बोलणं होऊ शकत नाही मात्र प्रकाश आंबेडकरांसोबत आम्ही बोलायला तयार आहोत. मी अशोक चव्हाण यांना सांगू इच्छितो की तेलंगणा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे तुमच्यापेक्षा मोठे नेते मला म्हणतं होते… औवेसी आम्हाला काही मदत होईल का??? तुम्हाला जर आमच्याशी नसेल बोलायचं तर नका बोलू पण आमचे मोठे बंधू प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या प्रतिष्ठेने जागा द्या. त्यांच्याशी बोलून घ्या. मी तुमच्या स्टेजवर देखील येत नाही. मी वंचित आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. मला ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय ना राहुल गांधींसारखं देशाचा पंतप्रधान…

प्रकाश आंबेडकर आपल्या भाषणात काय म्हणाले??

भाषणाच्या सुरूवातीलाच प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवैसी यांचे आभार मानले. आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतूक केले तर दुसरीकडे भाजपवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.

डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून शस्त्रसाठा पकडणाऱ्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो. आता पोलिसांनी नागपूर येथील रेशीमबागमध्ये सुद्धा धाड मारावी. तीथे धाड मारल्यावर तुम्हाला AK 47 सापडतील, अशा शब्दांत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका केली.

सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालण्यास मी कधीही तयार आहे. मोहन भागवतांनी वेळ आणि तारीख ठरवावी आणि मला चर्चेला बोलवावं, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी सरसंघचालकांना दिलं आहे.

आज नांदेडमध्ये झालेल्या आंबेडकर-ओवैसींच्या सभेने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं मोठ्या वेगानं बदलतील. नव्या राजकीय समीकरणाची नांदी होईल. काँग्रेस राष्ट्रवादीला नको असलेला एमआयएम पक्ष, बाजूला होणार असल्याची भाषा करतोय म्हटल्यावर ते प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून युतीही करतील. यामुळेच येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार हे मात्र नक्की.

या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा