अविश्वास ठरावाला भीत नाहीत तुकाराम मुंडे; दिलं सडेतोड प्रत्युत्तर

नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणणार आहे. या अविश्वास ठरावाविरोधात नाशिककरांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. तुकाराम मुंडेंनी या ठरावाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या बदलीमुळे नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच माझी बदली करा, असं त्यांनी म्हटलं आहे. नाशिककरांचा तुकाराम मुंडेंना वाढता पाठिंबा मिळतोय. या पाठिंब्याबद्दलही त्यांनी नाशिककर जनतेचे आभार मानले आहेत.

करवाढीबाबत काय म्हणाले तुकाराम मुंढे?

“माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. करवाढीबाबत चुकीचा संभ्रम तयार केला जातोय. मी 40 पैसे करवाढ केली होती ती 5 पैशांवर आणली आहे. करवाढीचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केलं जातंय.

रस्त्यांची कामं का थांबवली?

“नाशिकमध्ये येताच मी ऑडिट केलं. शहरात जवळपास 2 लाख प्रॉपर्टी अनधिकृत सापडल्या. 257 कोटी रुपयांची रस्त्यांची कामं थांबवली आहेत. कारण ही कामं रस्ते दुरुस्तीची आहेत. कुंभमेळ्याच्या काळात चुकीच्या पद्धतीने ही कामं करण्यात आली. एकीकडे पालिकेत समाविष्ट 22 ते 23 गावांमध्ये मातीचे रस्ते आहेत आणि दुसरीकडे शहरात नव्याने केलेल्या रस्त्यांवर पुन्हा कोट्यवधींचा खर्च केला जातो.

नगरसेवक निधी खर्च होत नाही-

“नगरसेवक निधी 75 लाख रुपये होता. कायद्यानुसार तो कमी केला. बजेटच्या 2 टक्के नगरसेवक निधी असतो, आता तो तेवढाच ठेवलाय. तसं पाहिलं तर नगरसेवक निधीतला एक रुपयाही खर्च झालेला नाही. अयोग्य आणि कायद्याच्या बाहेरील गोष्ट माझ्याकडून अपेक्षित करत असाल तर त्या होणार नाहीत आणि हे चुकीचं आहे का ते अविश्वास आणणाऱ्यांनाच विचारावं. माझं काम नाशिकच्या विकासासाठी चाललं आहे. त्यासाठी मला योग्य वेळ आणि निधी अपेक्षित आहे. करवाढीतून निधी जमवण्याचा प्रयत्न सुरु आहे.