अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांची नवी मालिका ‘तुला पाहते रे’ प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घालत आहे. प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत असून अवघ्या काही दिवसांमध्ये या मालिकेने प्रसिद्धीचे नवे मापदंड तयार केले आहेत. सुबोध भावे लोकांचा चांगलाच भावत असून गायत्रीची भूमिकाही लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेचे प्रोमो पाहिले तेव्हाच अनेकांनी ही मालिका प्रसिद्धीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल असं जाहीर केलं होतं. आता हे प्रत्यक्षात घडताना दिसत आहे.
मालिका नंबर एकवर येणार?
मालिकांमध्ये टीआरपी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. सर्वाधिक टीआरपी म्हणजेच ती मालिका सर्वाधिक लोक पाहात असतात. टीआरपीच्या आकड्यावरुन मालिकांची प्रसिद्धी मोजली जाते. वाहिन्यांना जाहिराती मिळवण्यासाठी हाच टीआरपी महत्त्वाचा असतो. BARC नावाची संस्था हे टीआरपीचे आकडे दर आठवड्याला जाहीर करत असते. दर गुरुवारी हे आकडे जाहीर केले जातात. गेल्या गुरुवारी जाहीर झालेल्या आकड्यांनूसार ‘तुला पाहते रे’ ही मालिका क्रमांक दोनवर आहे. ही या मालिकेची विक्रमी कामगिरी आहे. गुरुवार (30 ऑगस्ट रोजी) नवे टीआरपीचे आकडे समोर येतील. या आकड्यांमध्ये तुला पाहते रे ही मालिका नंबर एकवर असेल असं अनेकांचं म्हणणं आहे.
TRP मध्ये क्रमांक एक वर कोणती मालिका?
मराठी मालिकांमध्ये सर्वात जास्त क्रेझ असलेली मालिका कोणती?, असा प्रश्न कुणालाही विचारला तरी या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सध्या प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. लाखो लोक रोज न चुकता ही मालिका पाहात असतात. राधिका, शनाया आणि गुरुची केमिस्ट्री लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अर्थात हीच मालिका मराठी मालिकांमध्ये नंबर एकवर आहे. येत्या टीआरपीत काय होणार हे मात्र कुणालाच माहीत नाही. माझ्या नवऱ्याची बायको मालिका आपला टीआरपी टिकवणार की तुला पाहते रे या मालिकेला मागं टाकून क्रमांक एकवर पोहोचणार हे पाहणं रंजक आहे.
तुला पाहते रे या मालिकेत नेमकं काय आहे?
तुला पाहते रे ही मालिका वय विसरुन प्रेम होतं, हे दाखवणारी मालिका आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावेला एका मध्यमवयीन बिझनेसमनची भूमिका दिली आहे. तर नवोदित अभिनेत्री गायत्री दातारला तरुणीची भूमिका दिली आहे. दोघांमध्ये वयाचं मोठं अंतर आहे , दोघे वेगवेगळ्या वर्गाचं प्रतिनिधीत्व करत आहेत, दोघे वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीचे आहेत तरी दोघांमध्ये प्रेम फुलतं, असं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. सुबोध भावे मराठी अभिनय क्षेत्रातील मोठं नाव आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. त्याचा सहजसुंदर अभिनय लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
दुसरीकडे गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री आहे. तिच्याकडे अवखळ-निरागस मुलीची भूमिका निभावण्याची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. गायत्री नवोदित असली तरी ती ही भूमिका अत्यंत ताकदीने निभावताना दिसत आहे. अनेकांना ती बालिश वाटते, मात्र तिचं बालिश वाटणंच मालिकेच्या प्रसिद्धीत मोठा वाटा उचलत आहे. त्यामुळे ही मालिका यशस्वी होण्यात जितका सुबोध भावेचा हात आहे तितकाच गायत्रीचा देखील आहे.
मालिकेचं टायटल ट्रॅक अनेकांना भूरळ घालतंय-
तुला पाहते रे मालिकेचं टायटल ट्रॅक अत्यंत वेगळ्या पद्धतीनं बनवण्यात आलं आहे. शुटींग असो वा एडीटिंग प्रत्येक गोष्ट छान जमून आली आहे. सुबोध आणि गायत्री या गाण्यात कमाल दिसत आहेत. गायिका आर्या आंबेकरनं या गाण्याला चार चाँद लावले आहेत. हे टायटल ट्रॅक अनेकजण रोज गुणगुणत असल्याचं पहायला मिळतंय.