औरंगाबाद महाराष्ट्र

हिरमोड झालेला मराठा उसळला; भवानीची शपथ घेऊन पुन्हा मैदानात

तुळजापूर : मराठा आरक्षणाचं दुसरं पर्व सुरु झालं आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिरात जागरण गोंधळ घालत मराठा समाजाने पुन्हा सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. यावेळी मराठा मोर्चा मूक नसणार आहे. यापुढे मराठा मोर्चा बोलका असेल याशिवाय गनिमी काव्याचा वापर केला जाईल.

पहिल्या पर्वात मूकमोर्चा-

मराठा आरक्षणासाठी याआधी मराठा समाजानं एल्गार केला होता. कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे निघण्यास सुरुवात झाली होती. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढल्यानंतर मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता. 

मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली-

शैक्षणिक सवलती सोडल्यास मराठा समाजाच्या हाती काहीच पडलं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून आयोगाकडे पडून आहे. आरक्षणाबाबत ठोस काही निर्णय झाला नाही. न्यायालयालाही हस्तक्षेप करत अहवाल केव्हा सादर करणार? अशी विचारणा राज्य सरकारकडे करावी लागली. 

आता मूक नव्हे ठोक मोर्चा-

मराठा समाजाचा संयम आता सुटत चालला आहे. आश्वासनं देऊन आपल्या तोंडाला पानं पुसली गेली, अशी भावना मराठा समाजाची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजामध्ये असंतोष खदखदत आहे. तुळजापूरच्या रुपाने हा अंसतोष बाहेर पडला आहे. 

तुळजापुरातून नवी सुरुवात-

तुळजापुरात मराठा समाजाकडून एक रॅली देखील काढण्यात आली. भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतमालला भाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अट्रॉसिटी कायद्यात बदल करा, कोपर्डी बलात्कार पीडितेला न्याय द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

IMPIMP